मडगावातील पिंपळकट्टय़ानजीकच्या परिसरातील प्रकार : एका कारचेही नुकसान, स्थानिक नगरसेविका-मुख्याधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या मध्यवर्ती शहरी भागात असलेल्या पिंपळकट्टय़ासमोरील एका जुन्या इमारतीच्या प्लास्टरचे तसेच क्राँक्रीटचे तुकडे शुक्रवारी दुपारी रस्त्यावर कोसळल्याने एका युवतीला किरकोळ इजा झाली, तर इमारतीखाली पार्क केलेल्या एका कारचे नुकसान झाले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
एरव्ही गजबजलेल्या राहणाऱया या रस्त्यावर मोठी वर्दळ नव्हती, तरी कोसळलेल्या काँक्रिटच्या तुकडय़ांपैकी एक तुकडा एका युवतीच्या पाठीला लागल्याने तिला किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावून जखमीवर उपचार करण्यात आले. बँक ऑफ बडोदा या बँकेचे एटीएम कक्ष असलेल्या या वरच्या मजल्यावरील प्लास्टर व काँक्रिटचे तुकडे अचानक खाली कोसळू लागल्याने रस्त्यावर असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र येथे पार्क कलेल्या कारच्या दर्शनी भागाची हानी झाली तसेच खिडक्यांच्या काचा काँक्रिटचे मोठे तुकडे पडल्याने फुटल्या. याशिवाय कारच्या वरच्या भागाला भेगा पडल्याचे दिसून आले आहे.
इमारत मालकाला नोटीस बजावण्याचे निर्देश
सध्या पोलिसांकडून सदर इमारतीच्या खचलेल्या भागाच्या खालील रस्ता सुरक्षेसाठी ‘कॉर्डन’ करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली. यावेळी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस उपस्थित होते. मुख्याधिकाऱयांनी सदर इमारतीच्या मालकाला नोटीस बजावण्याचे निर्देश यावेळी दिले. यासंदर्भात पालिका अभियंता आर्सेकर यांच्याशी विचारणा केली असता डायस नामक व्यक्तीची इमारत सदर असून त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करावे
मडगावचा शहरी भाग आपल्या प्रभाग 14 च्या कार्यकक्षेत येतो. येथे कित्येक जुन्या इमारती आहेत. तेथे अशा प्रकारच्या सिमेंट-काँक्रिटचे तुकडे कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. श्री दामबाबाची कृपा म्हणून आजपर्यंत मोठी दुर्घटना न घडता थोडक्यावरच निभावले आहे. पालिकेच्या तांत्रिक विभागाने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज असून ज्या इमारती कमकुवत बनलेल्या आहेत त्यासंदर्भात आवश्यक कृती करून प्रसंगी सील करण्याची आवश्यकता आहे, असे मत नगरसेविका डॉ. रोनिता यांनी याप्रसंगी व्यक्त केले. लोकांच्या जिवावर बेतणार नाही याची काळजी घेताना पालिकेने पुन्हा एकदा आपल्या प्रभागातील इमारतींचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वर्षभरापूर्वी ‘काझा मिनेझिस’ या इमारतीच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. त्याशिवाय हॉटेल अशोकच्या जवळ असलेल्या एका जुन्या इमारतीचेही सिमेंट-काँक्रिटचे तुकडे पडण्याचे प्रकार घडले होते. शुक्रवारची घटना घडली त्यावेळी त्या इमारतीच्या परिसरात वर्दळ नव्हती. अन्यथा सकाळच्या वेळी येथे घाऊक फळ-भाज्यांचा बाजार भरत असतो तसेच सायंकाळी फळ-भाज्यांचे विक्रेते येथे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बसत असतात. अशा वेळी हा प्रकार घडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती.