मारिहाळ पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील दुहेरी खूनप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. आणखी एकजण फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली होती.
परशराम भावकाण्णा केदार (वय 26, रा. चव्हाट गल्ली, मुतगा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार शुभम अद्याप फरारी आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. बी. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
रविवार दि. 25 डिसेंबर रोजी रात्री गिरीश यल्लाप्पा नागुण्णावर (वय 24), बसवराज मारुती बेळगावकर (वय 24, दोघेही रा. शिंदोळी) या तरुणांचा भीषण खून करण्यात आला होता. दुहेरी खुनाच्या घटनेने एकच खळबळ माजली होती. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाने हा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले होते. पोलिसांनी परशरामला अटक केली आहे.