वाकरे / प्रतिनिधी
वाकरेपैकी पोवारवाडी (ता. करवीर) येथील ग्रामोजेन हे विषारी तणनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना शुक्रवारी मृत्यू झाला. युवराज भिकाजी पोवार (वय २७) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळ व करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, मयत युवराज पोवार हा एमआयडीसी, शिरोली येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. गेले दोन दिवस आजारी असल्याने तो कामावर गेला नव्हता. गुरुवारी रात्री कामावर जाणार असल्याचे सांगून दुपारी तो घरातील दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. सायंकाळचे पाच वाजले म्हणून आई-वडील त्याला उठवण्यास गेले असता त्याचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा ठोठावला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सागर पोवार याने दरवाजा मोडून आज प्रवेश केला असता युवराज निपचित पडल्याचे निदर्शनास आले, तसेच त्याच्या बाजूला त्याने उलटी केल्याचे दिसून आले. शेजारी पडलेल्या बाटलीवरून त्याने ग्रामोजेन हे विषारी तणनाशक प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्याला त्वरित कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डायलिसिस करण्यासाठी त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता पुन्हा त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास शवविच्छेदन करून रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविवाहित असणाऱ्या युवराजने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे