अज्ञाताचे कृत्य : एकजण गंभीर जखमी : ऐगळी पोलिसात घटनेची नोंद
वार्ताहर /अथणी
कोकटनूर (ता. अथणी) येथे यल्लम्मा देवीची यात्रा साजरी करण्यात येत असून अज्ञात व्यक्तीने चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. गणेश पंडित शिकलगार (वय 23, रा. अथणी) असे मृताचे तर नरेंद्र घटकांबळे (वय 32, रा. अथणी) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, गणेश व नरेंद्र हे कोकटनूर येथे साजऱ्या होणाऱ्या यल्लम्मा यात्रेसाठी मंगळवारी गेले होते. तेथे रात्री देवदर्शन घेतल्यानंतर ते घरी परतत होते. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने गणेश याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो गतप्राण झाला. तर त्यावेळी गणेश व अज्ञात व्यक्तीत सुरू असलेली झटापट सोडविण्यासाठी नरेंद्र गेल्यानंतर त्यालाही गंभीररित्या मारहाण करण्यात आली.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे यात्रेकऊंची तारांबळ उडाली. सदर घटनेची माहिती तत्काळ ऐगळी पोलिसांना देण्यात आली. जखमी नरेंद्र याला अथणी येथील खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अतिरिक्त पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांनी जखमीची दवाखान्यात भेट देऊन पाहणी केली. नरेंद्र याच्याकडून माहिती घेऊन घटनास्थळाला भेट दिली. सदर प्रकाराविषयी सविस्तर माहिती घेऊन पाहणी केली.
घटनेची माहिती मिळताच अथणीचे डीएसपी विश्वनाथ जलदे, सीपीआय रवींद्र नायकवडी, ऐगळी पीएसआय शिवाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद ऐगळी पोलिसात झाली आहे. खून करण्यामागील कारण व संशयीचा शोध गतीने घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.