पहिल्या दिवशी स्पोर्ट्स कोटय़ांतर्गत भरती प्रक्रिया : भरतीसाठी 800 तरुणांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
देशसेवेत रुजू होण्यासाठी येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे सुरू झालेल्या अग्निवीर भरतीसाठी तरुणाईचा प्रचंड उत्साह दिसून आला. पहिल्या दिवशी स्पोर्ट्स कोटय़ांतर्गत भरती प्रक्रिया पार पडली. 750 ते 800 तरुण अग्निवीर भरतीसाठी सहभागी झाले होते. सैन्यातील भरतीसाठी अग्निवीर ही नवीन संकल्पना मांडण्यात आली असली तरी तरुणांचा उत्साह मात्र पूर्वीप्रमाणेच होता.
कोरोनामुळे मागील दोन ते अडीच वर्षात भरती प्रक्रिया पार पडली नाही. यामुळे तरुणांमध्ये प्रचंड नाराजी होती. अनेक तरुण रात्रंदिवस मेहनत करून सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करीत होते. त्यातच केंद्र सरकारने जुनी भरती प्रक्रिया रद्द करत अग्निवीरसाठी यापुढे भरती होईल, असे सांगितले. अग्निवीरसाठी कार्यकाळ कमी असल्यामुळे काही तरुणांनी याला विरोधही केला होता. हा विरोध मावळल्यानंतर आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
सोमवारपासून बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर भरतीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी भरती झाली. रविवारी सायंकाळपासूनच कॅम्पमधील रस्त्यांवर तरुणांची गर्दी झाली होती. रस्त्याशेजारी मिळेल त्या ठिकाणी व फूटपाथवर तरुणांनी आसरा घेतला होता. रात्री 12 वाजल्यापासून रिपोर्टिंगला सुरुवात झाली. सकाळी 4 वाजेपर्यंत रिपोर्टिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीला सुरुवात झाली. स्पोर्ट्स कोटय़ांतर्गत देशभरातील युवक यामध्ये सहभागी झाले होते.
पावसातही उराशी देशसेवेचे स्वप्न
रविवारी रात्री बेळगाव परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. अशा पावसातही तरुण रस्त्याशेजारी मध्यरात्रीपर्यंत घोळके करून बसले होते. रात्री अनेक तरुणांनी रस्त्याशेजारी जागून रात्र काढली. कितीही त्रास झाला तरी देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द युवकांमध्ये दिसून येत होती. काही सामाजिक संस्थांनी तरुणांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.