कारागृहात राहूनही कारनामे, प्रेयसीची एकांतात भेट घेण्यासाठी नियोजन, प्रकरण पोलिसांच्या अंगलट
प्रतिनिधी /बेळगाव
छोटा राजनचा हस्तक युसुफ बच्चाखान पुन्हा ठळक चर्चेत आला आहे. बेंगळूर येथील बिल्डर सुब्बराजू खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया युसुफमुळे काही पोलीसही अडचणीत आले आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असतानाही अधूनमधून तो चर्चेत असायचा. आता हुबळी-धारवाडमधील घटनेने त्याचे कारनामे फिरून एकदा सामोरे आले आहेत.
हुबळी येथील इरफान हंचनाळ ऊर्फ प्रूट इरफानच्या खूनप्रकरणी युसुफवरही एफआयआर दाखल झाला आहे. 6 ऑगस्ट 2020 रोजी अल ताज हॉटेल बाहेर बेछूट गोळीबार करून इरफानचा खून करण्यात आला होता. म्हैसूर येथील मध्यवर्ती कारागृहात राहूनच युसुफने आपल्या एकेकाळच्या मित्राचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.
प्रूट इरफान खूनप्रकरणाच्या सुनावणीसाठी शनिवारी युसुफला धारवाड न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयातील कामकाज आटोपून बळ्ळारी कारागृहात नेताना सत्तूरजवळील एका हॉटेलमध्ये पोलिसांसह तो जेवणासाठी गेला होता. या हॉटेलमध्ये त्याची बेंगळूर येथील प्रेयसी आधीच दाखल झाली होती. प्रेयसीसमवेत एकांतात असताना त्याला अटक करून त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.
बळ्ळारी कारागृहातून धारवाडला आणताना त्याला कडेकोट बंदोबस्त होता. बंदोबस्तावरील पोलिसांचे त्याला पुरेपूर सहकार्य होते. बळ्ळारीहून निघण्याआधीच त्याने हॉटेलमध्ये खोलीही बुक केली होती. म्हणून त्याची प्रेयसी आधीच खोलीत दाखल झाली होती. या प्रकाराला त्याला सुरक्षा पुरविणाऱया पोलिसांचीही साथ होती. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. या प्रकारावरून कारागृह आणि आरोपींना न्यायालयात आणताना त्यांना बंदोबस्त पुरविणाऱया पोलिसांचे साटेलोटे कसे असतात, यावर प्रकाश पडला आहे.
हुबळी-धारवाड या जुळय़ा शहराचे पोलीस आयुक्त लाभूराम यांच्या थेट नियंत्रणाखाली ही कारवाई झाली आहे. गोकुळ रोड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी युसुफला ताब्यात घेऊन विद्यागिरी पोलीस स्थानकात हजर केले. त्याच्यावर एफआयआर दाखल करून पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
बिल्डर सुब्बराजू खूनप्रकरणात युसुफ सुलेमान काद्री ऊर्फ युसुफ बच्चाखान याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात अलीकडेच कॅन्सरने मृत्युमुखी पडलेल्या गँगस्टर मुत्तप्पा रै व रवी पुजारी हे दोघेही संशयित आरोपी होते. सबळ पुराव्याअभावी या प्रकरणात त्यांची सुटका झाली. युसुफला मात्र जन्मठेपेची शिक्षा झाली. गेल्या 20 वर्षांपासून तो कारागृहात आहे.
युसुफ-रशिद यांच्यात कट्टर दुश्मनी
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी कारागृहात बसून मुंबईमध्ये अनेक बिल्डरांवर शूटआऊट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याचवेळी छोटा शकीलचा हस्तक रशिद मलबारीलाही सुरक्षिततेच्या कारणावरून हिंडलगा कारागृहात आणण्यात आले होते. युसुफ व रशिद यांच्यात कट्टर दुश्मनी होती. कारागृहात खटकेही उडू लागले. म्हणून या दोघा जणांना येथून हलविण्यात आले होते.
युसुफने तर बेळगावबरोबरच विजापूर, हुबळी-धारवाड, बळ्ळारी, म्हैसूर कारागृहात पाहुणचार घेतला आहे. युसुफ मूळचा बेंगळूरचा. मुंबई गुन्हेगारीत सामील झाल्यानंतर तो नावारुपाला आला. दाऊद इब्राहिमच्या विरोधात छोटा राजनच्या टोळीत सामील झालेल्या युसुफवर मुंबईतही अनेक गुन्हे दाखल आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असतानाच मुंबई येथील एका बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल झाला होता.
बिल्डर सुब्बराजू खूनप्रकरणात आपण अडकलो. मुत्तप्पा रै ची निर्दोष मुक्तता झाली. याला मुत्ताप्पाच कारणीभूत आहे, असे सांगणाऱया युसुफच्या मनात चीड होती. बेळगाव परिसरातही हिंडलगा कारागृहात असताना त्याने टोळी बनविण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या कारनाम्यांनी वारंवार वादग्रस्त ठरणारा युसुफ बच्चाखान पुन्हा ठळक चर्चेत आला आहे.
पोलिसांच्याही अडचणी वाढल्या
एखाद्या आरोपीला न्यायालयात हजर करताना त्याची ख्याती व पूर्वेतिहासावरून त्याला बंदोबस्त पुरविला जातो. न्यायालयाचे कामकाज आटोपून पुन्हा कारागृहाला परतताना जेवणाच्या निमित्ताने पोलिसांना हॉटेलला नेऊन अनेक गुन्हेगार फरारी झाल्याची उदाहरणे आहेत. काही प्रकरणात पोलिसांना फसविलेले असते. तर काही प्रकरणात पलायनाला अप्रत्यक्ष सहकार्य असते. कारागृह जर दूरवर असेल तर जेवणासाठी थांबावेच लागते. याच संधीचा फायदा घेऊन बेंगळूर येथील 32 वषीय प्रेयसीला धारवाडला बोलाविणाऱया युसुफमुळे बंदोबस्तावरील पोलिसांच्याही अडचणी वाढल्या आहेत.