वृत्तसंस्था/ अबुधाबी
आगामी होणाऱया अबुधाबी टी-10 लीग स्पर्धेत सहभागी होणाऱया अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाच्या मेंटरपदी भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. अबुधाबीतील या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश राहिल.
अमेरिकेतील क्रिकेट क्षेत्रामध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघ सध्या अव्वल म्हणून ओळखला जातो. या संघाच्या प्रँचायझीनी भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगची मेंटरपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सच्या क्रिकेटपटूंना आता युवराज सिंगचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभणार आहे. 2019 साली झालेल्या अबुधाबी टी-10 लिग स्पर्धेत युवराज सिंगने आपला सहभाग दर्शविला होता. या संघाचे सागर खन्ना हे प्रँचायझी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेला नजीकच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 2022 मधील सहावी अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा 23 नोंव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. दोन आठवडय़ांच्या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.