वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केंद्र सरकारने त्यांना असलेला धोका ओळखून झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संरक्षण त्यांना ते भारतात कोठेही गेले तरी देण्यात येईल. त्यांच्या संरक्षक दलात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक असतील, अशी माहिती देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अशी सुरक्षा देण्याच्या योजनेला यापूर्वीच संमती दिली आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार रामनाथ कोविंद यांना असलेला धोका लक्षात घेऊन योग्य ती सुरक्षा देण्यात आली आहे. यासंबंधीचा अहवाल 5 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्रालयाला देण्यात आला होता. रामनाथ कोविंद हे सध्या 76 वर्षांचे असून त्यांचा सुरक्षा धोका उच्च पातळीवरचा मानण्यात येत आहे.