वृत्तसंस्था /झाग्रेब, क्रोएशिया
येथे सुरू असलेल्या झाग्रेब ओपन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अमन सेहरावतने कांस्यपदकाची कमाई केली. भारतासाठी हे पहिले पदक ठरले. 17 वर्षीय अमनने कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या झेन राये ऱहोड्स रिचर्ड्सचा 10-4 अशा गुणांनी पराभव केला. अझरबैजानच्या अलिअब्बास रझाझादेने या प्रकारात सुवर्णपदक मिळविताना अंतिम लढतीत जपानच्या युतो निशियुचीचा 2-0 असा पराभव
केला.
जॉर्जियाच्या बेका बुजियाश्विलीने या प्रकारातील दुसरे कांस्यपदक मिळविताना अझरबैजानच्या इस्लाम बझरगनोव्हचा पराभव केला. भारताच्या अमनने त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत जॉर्जियाच्या रॉबर्टी दिंगाश्विलीचा पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला निशियुचीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तो रेपेचेज फेरीसाठी पात्र ठरला होता. त्याच्या जपानच्या प्रतिस्पर्धीने अंतिम फेरी गाठल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती.