वृत्तसंस्था/ लंडन
पाकिस्तानचे माजी महान क्रिकेटपटू झहीर अब्बास गंभीर आजारी असून त्यांना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 74 वर्षीय अब्बास यांना तीन दिवसांपूर्वी पॅडिंग्टनमधील सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एक शैलीदार फलंदाज म्हणून ओळख असलेले अब्बास दुबईहून लंडनला प्रवास करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना वेदना होऊ लागल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. ‘ते सध्या डायलिसीसवर असून लोकांना भेटण्यास डॉक्टरांनी त्यांना सक्त मनाई केली आहे,’ असे जिओ न्यूजने सांगितले.
1969 मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. नंतर त्यांच्या काळातील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पाकतर्फे खेळताना 72 कसोटीत त्यांनी 5062 आणि 62 वनडेमध्ये 2572 धावा जमविल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 459 सामन्यात 34,843 धावांची बरसात केली. त्यात 108 शतके आणि 158 अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर त्यांनी आयसीसी सामनाधिकारी म्हणून एक कसोटी व 3 वनडेत काम पाहिले आहे. 2020 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा कॅलिस व लिसा स्थळेकर यांच्यासह समावेश करण्यात आला.