मिस्टर 10 परसेंट’ या नावाने बदनाम पाकचे माजी राष्ट्रपती
वृत्तसंस्था / ऍमस्टरडॅम
नेदरलँडचे शालेय विद्यार्थी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराविषयी शिकत आहेत. तेथील शालेय पुस्तकात एक पूर्ण धडा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या पतीवर आधारित आहे. नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयानेही याची पुष्टी दिली आहे. झरदारी यांच्याविषयी एक धडा अभ्यासक्रमात सामील करत मुलांना भ्रष्टाचाराच्या परिणामांची जाणीव करून दिली जात असल्याचे नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
आसिल अली झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आहेत. तसेच 2008-13 दरम्यान ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी हे सध्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये विदेशमंत्री आहेत. आसिफ अली झरदारी यांच्या छायाचित्रासह भ्रष्टाचाराचा उल्लेख नेदरलँडच्या शालेय पुस्तकांमध्ये आहे. झरदारी यांच्या पत्नी बेनझीर या दोनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिल्या होत्या. 1988-90 आणि 1993-96 पर्यंत त्या पंतप्रधानपदावर होत्या. बेनझीर यांचे सरकार सत्तेवर असताना झरदारी यांनी मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे बोलले जाते. आसिफ अली झरदारी यांना या भ्रष्टाचारामुळे ‘मिस्टर 10 परसेंट’ हे नाव पडले होते. झरदारी हे प्रत्येक शासकीय कंत्राटांकरता 10 टक्के कशिमन मिळवत होते.