सोसायटी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने; 30 नोव्हेंबरला छाननी, 1 ते 15 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत; सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक प्रयत्नशील; सत्ताधाऱ्यांकडून मांडला जाणार संस्थेच्या प्रगतीचा मुद्दा
कृष्णात चौगले कोल्हापूर
वार्षिक 463 कोटींची अर्थिक उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून 29 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 30 रोजी छाननी तर 1 ते 15 डिसेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत आहे. 24 डिसेंबर रोजी मतदान होणार असले तरी या दिवशी शासकीय सुट्टी नसल्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गात काम करणारे कर्मचारी मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. त्यामुळे 1 जानेवारी (रविवारी) 2023 रोजी मतदान घ्यावे अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. सत्ताधाऱयांविरोधात प्रबळ आघाडी करण्याचा विरोधकांनी चंग बांधला असून चुरशीचा दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱयांसाठी 1966 साली सोसायटीची स्थापना झाली. शाहूपुरी साइक्स एक्सटेंशन येथे संस्थेची मुख्य इमारत आहे. गेल्या काही वर्षापासून संस्थेवर सत्तारूढचे प्रमुख नेते एम.आर.पाटील व सुकाणू समितीचे अध्यक्ष ए.व्ही. कांबळे, विश्वास साबळे, एम.ए.देसाई, राजाराम वरुटे, आदींचे वर्चस्व राहिले आहे. सध्या ए.व्ही.कांबळे हे संस्थेच्या राजकारणातून अलिप्त राहिले आहेत. तर एम. आर.पाटील हे पदोन्नतीने शासनाकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे ते सध्या सभासदही नाहीत. 2015 ला महालक्ष्मी सहकार सत्तारूढ आघाडी व महालक्ष्मी विकास आघाडी यांच्यात चुरशीची दुरंगी लढत झाली. त्यावेळी विरोधी विकास आघाडीच्या चतुर्थ श्रेणी प्रतिनिधी गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने उर्वरित सर्व सतरा जागावर बाजी मारली. मात्र विरोधी आघाडीने चुरशीची लढत दिली होती. सध्याच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे उशिरा संस्थेची निवडणूक होणार आहे. सध्या सत्तारूढ आघाडीतील अनेक नेते सेवानिवृत्त झाले आहेत. परिणामी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी संस्थेच्या राजकारणात लक्ष घालू नये असा प्रचार विरोधी आघाडीकडून सुरू आहे. त्यामुळे सत्तारुढ आघाडीकडून कार्यरत कर्मचाऱयांची नवीन सुकाणू समितीची मोट बांधण्याचे नियोजन सुरु आहे.
गतपंचवार्षिक निवडणुकीत विरोधी आघाडीचे नेते सचिन जाधव त्यांनी अखेरच्या टप्प्यात सत्तारूढ आघाडीविरोधात ताकदीने लढा दिला होता. सध्या संस्थेचे अध्यक्ष राजीव परिट व महावीर सोळांकुरे सत्ताधारी गटाचे नेतृत्व करत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये गडहिग्लज शाखेत झालेल्या आर्थिक अनियमिततेचा मुद्दा विरोधकांकडून उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. तर सत्तारुढ आघाडीकडून संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला जाणार आहे.
सोसायटीच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये मिनिस्टरी केडरसाठी 3, ग्रामसेवक 3, तांत्रिक संघटना 4, महिला 2, शिक्षक 3, अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, ओबीसी 1, परिचर 3 अशा स्वरूपात 21 जागांची विभागणी झाली आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्तारूढ गटाचा प्रयत्न सुरु आहेत. 6 ते 7 जागा विरोधी आघाडीला देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. 1 ते 15 डिसेंबरपर्यंत माघरीची मुदत असल्यामुळे माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महावीर सोळांकुरे. सत्ताधारी आघाडीचे नेते.
सत्ताधाऱ्यांकडून बिनविरोधसाठी योग्य प्रस्ताव आल्यास सर्व संघटनांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही निवडणुकीची तयारी सुरु केली असून सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सचिन जाधव, विरोधी आघाडी
संस्थेची सांपत्तीक स्थिती
सभासद संख्या – 3266
भाग भांडवल – 11 कोटी 10 लाख
निधी – 18 कोटी 87 लाख
ठेवी – 142 कोटी 33 लाख
गुंतवणूक 24 कोटी 53 लाख
सभासद कर्जे – 154 कोटी 54 लाख
खेळते भांडवल -191 कोटी 8 लाख
एकूण उलाढाल – 463 कोटी 35 लाख