इच्छूकांच्या नजरा, पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणाची सोडत तालुका पातळीवर होणार
प्रतिनिधी/सातारा
नव्याने काढण्यात आलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार जिह्यातील जिल्हा परिषदेच्या 73 गटांचे व पंचायत समितीचे 146 गणांची आरक्षण सोडत गुरुवार दि. 28 रोजी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. तसे नियोजन ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडून करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. दरम्यान, आरक्षण कोणत्या गटात कसे पडेल याचे तर्कवितर्क इच्छूकांकडून लावले जात आहेत. तर आरक्षण कसे पडेल तिकीट आपल्यालाच कशी मिळेल यासाठी आतापासूनच इच्छूकांनी तयारी केलेली आहे.
हे ही वाचा : पोलिसांच्या तत्परतेवर समाधान अॅपची नजर
सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांची मुदत ही मार्च महिन्यात मुदत संपली आहे. तर पंचायत समितीच्या सदस्यांची मुदतही फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. सध्या प्रशासकीय राजवट जिल्हा परिषद पंचायत समितीवर आले. निवडणूका लागणे अपेक्षित होते परंतु कोरोनाच्या कारणामुळे निवडणूका जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यातच पावसामुळे आणखी निवडणूका लांबणीवर ढकलल्या गेल्या आहेत. आरक्षण सोडत होणार होती तीही थांबवली गेली होती. आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागला आहे. नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार जाहीर केलेला आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांचे आरक्षणण सोडत दि. 28 रोजी काढण्यात येणार आहे. दि. 29 रोजी जिल्हाधिकारी हे गणनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचना प्रसिद्ध करणार आहेत. दि. 29 जुलै ते 2 ऑगस्ट हा कालावधी हरकती दाखल करण्याचा आहे. दि. 5 रोजी आलेल्या हरकतींवरील सुचनांचा विचार करुन अंतिम आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
तालुका गट गणेश
महाबळेश्वर 2 4
वाई 5 10
खंडाळा 3 6
फलटण 9 18
माण 5 10
खटाव 8 16
कोरेगाव 6 12
सातारा 10 20
जावली 3 6
पाटण 8 16
कराड 14 28