पुणे / प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी येथे दिल्या.
पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कूल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा : Pune : चांदणी चौक परिसरात कलम 144 लागू
पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा. केंद्राच्या योजनांचा मोठय़ा प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसेच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसेच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत.
विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन
तत्पूर्वी जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने सनियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी या कक्षाचा उपयोग होईल, असे पाटील या वेळी सांगितले.