टी-20 विश्वचषक : पाकचा दुसरा पराभव, सिकंदर रझा सामनावीर, मसूद, वासिमचे प्रयत्न वाया
वृत्तसंस्था /पर्थ
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील सामन्यात झिम्बाब्वेने बलाढय़ पाकिस्तानला केवळ एका धावेने पराभवाचा धक्का देत खळबळ माजविली. पाकचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांना भारताकडूनही शेवटच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला. 25 धावांत 3 बळी टिपणाऱया व जन्माने पाकिस्तानी असणाऱया अष्टपैलू सिकंदर रझाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रथम फलंदाजी करणाऱया झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर पाकला 20 षटकांत 8 बाद 129 धावांवर रोखत झिम्बाब्वेने केवळ एका धावेने सनसनाटी विजय नोंदवत पाकिस्तानला चकित केले. या पराभवामुळे पाकच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशेला धक्का बसला आहे. झिम्बाब्वेने मात्र 3 गुणांसह समाधानकारक स्थान मिळविले अजून त्यांचे पुढील सामने नेदरलँड्स, बांगलादेश व भारताविरुद्ध होणार आहेत.
19 षटकाअखेर पाकने 6 बाद 120 धावा जमविल्या होत्या. त्यांना शेवटच्या षटकांत 11 धावांची गरज होती. इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद नवाझने 3 धावा घेतल्यानंतर दुसऱया चेंडूवर मोहम्मद वासिमने चौकार ठोकत विजय जवळ आणला. पुढच्या 4 चेंडूत त्यांना 4 धावा काढायच्या होत्या. वासिमने तिसऱया चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर नवाझला चौथ्या चेंडूवर धाव घेता आली नाही. पाचव्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला. पण मिडऑफ क्षेत्रात कर्णधार क्रेग एर्विने त्याचा झेल टिपल्यानंतर पाकला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने इव्हान्सचा चेंडू लाँगऑनच्या दिशने फटकावला आणि धाव घेण्यास सुरुवात केली. पण वासिमकडून त्याला लगेच प्रतिसाद मिळाला नाही. सिकंदर रझाने चेंडू कलेक्ट करून गोलंदाजाच्या दिशेने फेकला. पण त्यावेळी वासिम क्रीझमध्ये पोहोचला होता. गोलंदाजाने लगेचच चेंडू यष्टिरक्षक चकबव्हाकडे फेकला. तो चेंडू कलेक्ट करताना अडखळला. पण लगेच सावरत त्याने यष्टय़ा उडविल्या त्यावेळी शाहीन आफ्रिदी क्रीझपासून बराच दूर होता. आफ्रिदी धावचीत झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी व त्यांच्या समर्थकांनी एक संस्मरणीय विजय मिळविल्याचा जल्लोष सुरू केला.
झिम्बाब्वेच्या डावात सीन विल्यम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या तर ब्रॅड इव्हान्स व क्रेग एर्विन यांनी प्रत्येकी 19, मधेवेरेने 17 व बर्लने नाबाद 10 धावा केल्या. पाकच्या मोहम्मद वासिमने 24 धावांत 4, शदाब खानने 23 धावांत 3 बळी मिळविले. हॅरिस रौफला एक बळी मिळविता आला. पाकच्या डावात मोहम्मद रिझवान व कर्णधार बाबर आझम सलग दुसऱया सामन्यात अपयशी ठरले. रिझवान 14 तर बाबर 4 धावा काढून बाद झाले. इफ्तिखार अहमदही फार वेळ टिकला नाही. 7.4 षटकांत पाकची स्थिती 3 बाद 36 अशी झाली होती. शान मसूद व शदाब खान यांनी डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी केली. सिकंदर रझाने या दोघांसह हैदर अलीला झटपट बाद करून झिम्बाब्वेला विजयाची संधी निर्माण करून दिली. पाकची स्थिती 3 बाद 88 वरून 6 बाद 94 अशी झाली. नवाझने 22 धावा करीत पाकच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर नवाझ व शाहीन बाद झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. गुणतक्त्यात पाक संघ सध्या पाचव्या स्थानावर असून त्यांची पुढील फेरीची वाटचाल अवघड बनली आहे. रझाने 3 तर इव्हान्सने 2 व जाँगवे व मुझरबानी यांनी एकेक बळी मिळविला.
पाकचा पुढील सामना 30 रोजी नेदरलँड्सविरुद्ध तर झिम्बाब्वेचा पुढील सामना त्याच दिवशी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे 20 षटकांत 8 बाद 130 : मधेवेरे 17 (13 चेंडूत 3 चौकार), एर्विन 19 (19 चेंडूत 2 चौकार), विल्यम्स 31 (28 चेंडूत 3 चौकार), बर्ल नाबाद 10, इव्हान्स 19, रझा 9, अवांतर 14. गोलंदाजी : मोहम्मद वासिम 4-24, शदाब खान 3-23, रौफ 1-12.
पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 129 : रिझवान 14 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शान मसूद 44 (38 चेंडूत 3 चौकार), शदाब खान 17 (14 चेंडूत 1 षटकार), मोहम्मद नवाझ 22 (18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वासिम नाबाद 12 (13 चेंडूत 2 चौकार), आफ्रिदी 1. अवांतर 10. गोलंदाजी : सिकंदर रझा 3-25, इव्हान्स 2-25, मुझरबानी 1-18, जाँगवे 1-10.