ऑनलाईन टीम / मुंबई:
पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार राजेंद गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी पराभूत केले. स्थानिक उमेदवाराला डावलल्यामुळे गावित यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येते.
डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटात स्थानिक उमेदवारांना डावलून खासदार गावित यांनी मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी होती. मागील 8 वर्षापासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱया गावितांना मुलाच्या विजयाची खात्री होतीच. मात्र, आज लागलेल्या निकालात गावितांच्या मुलाचा अनपेक्षितपणे पराभव झाला. रोहित गावित यांचा हा पराभव एकप्रकारे राजेंद्र गावितांचाच पराभव मानला जात आहे.
वणई जिल्हा परिषद गटातील या तिकिटासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी इच्छुक होते. त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचाच फटका गावित यांना बसल्याचे समजते.