Tarun Bharat

झुआरी पुल डिसेंबर अखेरीस खुला

भार (वजन) चाचणीची अंतिम प्रक्रिया पूर्ण : सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सज्जतेला प्राध्यान्य : साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून पाहणी

प्रतिनिधी / वास्को

झुआरी नदीवरील नवीन चौपदरी पुल डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यात येईल. सुरक्षेबाबतच्या सर्व उपाययोजना व खात्री झाल्यानंतरच या पुलाचे उद्घाटन होईल. पुलाच्या अंतिम भार चाचणीची प्रक्रिया सुरू झालेली असून सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी बुधवारी दुपारी पुलाची पाहणी केली.

दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणारा झुआरी नदीवरील हा नवीन केबल स्टेड पुल खुला होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. हा पुल तब्बल आठ पदरी असून एका बाजुचा म्हणजेच मडगाव ते पणजी मार्गाचा चौपदरी पुल पुर्णत्वास आलेला आहे. सध्या अंतिम टप्पातील सर्व कामे उरकण्यात येत आहेत.

प्रत्येकी 32 टन वजनाचे 32 ट्रक उभे

काल बुधवारी दुपारी या सज्ज झालेल्या नवीन पुलाच्या अंतिम भार चाचणीला प्रारंभ करण्यात आला. अंतिम भार चाचणीसाठी बुधवारी या पुलावर चार रांगेत प्रत्येकी 32 टन वजनाचे 32 ट्रक उभे करण्यात आले. भार चाचणीसाठीची ही प्रक्रिया काही दिवस चालणार असून चाचणीसाठी काही अवजड वाहनांची वर्दळ या पुलावर काही दिवस असणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी सुरक्षेची पूर्ण खात्री झाल्यानंतरच डिसेंबरच्या अखेरपर्यंत हा पुल वाहतुकीला खुला करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मंत्री, अधिकारी, तंत्रज्ञांनी केली पाहणी

बुधवारी दुपारी मंत्री काब्राल यांनी पुलाला भेट दिली आणि पुलाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, पुलाची उभारणी करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच वाहतूक पोलीस उपअधीक्षक बोसुएट सिल्वा, वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर उपस्थित होते. मंत्र्यांनी या पुलाची पाहणी करताना पुलाची सज्जता व सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली तसेच लवकरच हा पुल वाहतुकीस खुला होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेविषयी व उपाययोजना आणि खबरदारी विषयी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना मंत्री काब्राल यांनी हा पुल डिसेंबर अखेरीस वाहतुकीला खुला करण्यात येईल, असे आपण पूर्वीपासून सांगत आलेलो आहे. आताही तेच सांगत असून डिसेंबर अखेरपर्यंत नवीन पुलाचे उद्घाटन करण्यासाठी तयारी चाललेली आहे. मात्र, सुरक्षेची खात्री झाल्यानंतरच हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला करण्यात येईल असे ते म्हणाले.

नवीन पुल खुला झाल्यानंतर अशी असणार वाहतूक

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पुल वाहतुकीस खुला केल्यानंतर वास्को आणि मडगावहून पणजीकडे जाणारी वाहतुक या पुलावरून सुरळीतपणे सुरू होईल. झुआरी नदीवरील जुन्या पुलावरून अवजड वाहतूक होत नसल्याने नव्या पुलावरील एका बाजुने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सोय करण्यात आलेली आहे. जुना पुल केवळ पणजीहून मडगाव व वास्कोच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीच एकेरी मार्ग म्हणून वापरला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत राहणार आहे. येत्या दोन वर्षांत म्हणजेच 2024 पर्यंत झुआरी नदीवरील दुसऱ्या चौपदरी नवीन पुलाचेही काम पूर्ण होणार आहे.

Related Stories

स्थानिक भाषांमधून विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक

Amit Kulkarni

शॅक व्यवसाय करणाऱयांना त्रास देणे थांबवा -सरदेसाई

Patil_p

मुरगाव तालुक्यात चाचण्या आणि लसीकरणाकडे ओघ वाढला

Amit Kulkarni

वास्कोत कार्निव्हल मिरवणुक उत्साहात, हजारो नागरिकांचा प्रतिसाद

Amit Kulkarni

कुंभारजुवे मतदारसंघात बदलासाठी मला निवडावे

Amit Kulkarni

एका महिन्यात दुकाने खाली करा

Amit Kulkarni