प्रतिनिधी / जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनाथ बाळासो कदम ( रा. राजीव गांधीनगर जयसिंगपूर) असे पोलीसांनी जेलबंद केलेल्या चोरटयाचे नाव आहे. दरम्यान मुख्य चोरट्याने आपल्या मित्राच्या साहाय्याने चोरीचा मुद्देमाल अर्जुनवाड मिरज दरम्यान पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात टाकला होता. अथक प्रयत्नानंतर औरवाड येथील रौप पटेल यांच्या मार्गदर्शनखाली दोन तासांनी कृष्णा नदीच्या पात्रातून मोबाईलची बॅग शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुरुवार दि. 9 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून तब्बल 185 मोबाईल संच चोरट्याने चोरले होते. सदर मोबाईल हे विविध गुन्ह्यातील होते. चोरीमुळे पोलीस ठाणे असुरक्षित बनल्याने खळबळ माजली होती. याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतल्याने तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली होती. तसेच जयसिंगपूरसह जवळपासच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कसून तपासणी करण्यात आली होती. इतकेच नाही तर जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर भागात कॉम्बिनग ऑपरेशन राबविले होते अखेर यामध्ये संशयित चोरट्याला पकडण्यात यश आले असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक किशोर काळे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली.