आधुनिक सरावाचे मुलींना मिळणार प्रशिक्षण, नामवंत प्रशिक्षकांना निमंत्रित करणार
संग्राम काटकर कोल्हापूर
कोल्हापूरकरांचा श्वास आणि ध्यास बनलेल्या फुटबॉलचा फिव्हर मुलींमध्ये वाढत आहे. वैशिष्ठ म्हणजे मुलासोबत मुलीने ही फुटबॉल खेळले पाहिजे, अशी भावना पालकांमध्ये निर्माण होत आहे. शिवाय नव्या दमाच्या अनेक मुली तर स्वयंस्फुर्तीने फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात येत आहेत. पण त्यांना सरावासाठीचा प्लॅटफार्म मिळत नाही. हे सारं लक्षात घेऊन गोव्यातील धेम्पो स्पोर्टस् क्लबची टेक्निकल डायरेक्टर अंजू तुरंबेकरने (रा. गडहिंग्लज) कोल्हापूरी मुलींमध्ये फुटबॉलचे आधुनिक बीज पेरण्याचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी अंजूने येत्या काही महिन्यात कोल्हापूरात महिला फुटबॉल हब तयार करण्याचे पाऊल उचलले आहे. या हबमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नामवंत प्रशिक्षकांना निमंत्रित केले जाणार आहे.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यानंतर आता महिलांमध्ये फुटबॉलच्या वाढीसाठी प्रयत्नशील झालेली अंजूही दुसरी खेळाडू ठरली आहे. अलीकडेच ती जुना बुधवार पेठेतील सेक ऍकॅडमीचा वर्धापनदिनासाठी आली होती. अंजू आल्याची माहिती कळताच, फुटबॉल खेळणाऱ्या 70 ते 80 मुली तिच्या भेटीसाठी कार्यक्रमस्थळी गेल्या होत्या. या कार्यक्रमात अंजूने मार्गदर्शन करताना फुटबॉलमध्ये करिअर करायचे असेल तर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, असेही सांगितले. शिवाय फुटबॉलमध्ये खेळाडू, प्रशिक्षक व पंच म्हणून करिअर करता येते, असेही सुचवले.
याचवेळी फुटबॉल खेळणाऱ्या मुलींच्या पालकांनी अंजू विचारात पडेल, असे प्रश्न विचारले. मुली फुटबॉल खेळण्याचे प्रमाण चांगले असले तरी शाळा व कॉलेजनंतर त्यांचे फुटबॉल खेळणे बंद होते. शिवाय मुलींसाठी फुटबॉल अकॅडमीच नसल्याने पुरुषांप्रमाणे मैदान गाजवण्याची अंगात धमक असूनही मुलींना फुटबॉलपासून दुर रहावे लागते, असेही पालकांनी अंजूला पटवून सांगितले. अंजूनेही पालकांचे सांगणे मनावर घेऊन कोणत्याही परिस्थिती कोल्हापूरात महिला फुटबॉल हब तयार करण्याचा निश्चय केला. इतकेच नव्हे तर जास्तीत जास्त मुली फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात येतील, असे नवनवीन प्रयोग हाती घेण्याचेही पाऊल अंजूने उचलले आहे. महिला फुटबॉल हब तयार करण्यासाठी लागणारा पाठींबा मिळवण्यास कोल्हापुरातील मुलींना एकाच छताखाली बोलावण्याचे अंजूने ठरवले आहे. त्यामुळे आता मुली व त्यांचे पालक अंजूच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यास महिला फुटबॉल हब तयार होण्यास वेळ लागणार नाही.
अंजू तुरंबेकरचा परिचय
17 राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व
काही स्पर्धांमध्ये सांभाळली कर्णधार पदाची धुरा.
अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या ग्रासरुट कमिटीची प्रमुख व कोच इन्स्ट्रक्टर.
एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या ग्रासरुट पॅनेलवर मेंबर आणि टेक्निकल एक्स्पर्ट
मुलींची मोट बांधणार
महिला फुटबॉल हबला अस्तित्वात आणण्यासाठी फुटबॉल खेळणाऱया आजी-माजी खेळाडूंसह फुटबॉल खेळू इच्छिणाऱया मुलींची मोट बांधली जाणार आहे. शासनाकडून कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर तातडीने मुलींची बैठक बोलावून त्यांना हबसाठी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करणार आहे.