नाशिक / ऑनलाईन टीम
शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये होते. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी यूपीएच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले. सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत, त्यामुळे यूपीएचं नेतृत्व करण्यासाठी शरद पवार हे सक्षम व्यक्तिमत्व आहे.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केले. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावे. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
यासोबतच सचिन वाझे प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर विरोधक टीका करत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, कुणीही आले आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच.