पुढील काळात उच्च दाबाच्या वीजपुरवठ्याचे महावितरणाचे आश्वासन, निर्णयामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी / करमाळा
प्रति हॉर्स पॉवर एक हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांनी लाईट बिल भरल्यानंतर वीज कनेक्शन तात्काळ सुरू केले जातील असा तोडगा आज जेऊर येथे माजी आ. नारायण पाटील व वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित निर्णय झाला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पाचची हॉर्स पॉवर मोटर असेल तर पाच हजार रुपये भरून वीज जोडणी करून घ्यावी असे आवाहन नारायण पाटील यांनी केले.
या बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. माजी आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या करमाळा तालुक्यात महावितरण कंपनी यांनी केलेल्या विजतोडी संदर्भात महावितरणचे अधिकारी जाधव, गलांङे, काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी आ.नारायण पाटील व शेतकरी यांच्या समक्ष महावितरण अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला, की करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रति एचपी हजार इतकी रक्कम भरावी व आपली तोडलेली वीज चालू करावी. त्याचबरोबर कोळगाव येथील वीजेसंदर्भात ही चर्चा करण्यात आली व पुढील काळात उच्च दाबाचा वीजपुरवठा करू असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.