पुणे / प्रतिनिधी :
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’साठी राज्य सरकारतर्फे 2022-23 मधील पुरवणी मागण्यांदरम्यान मंजूर झालेल्या 50 कोटी रुपयांचा धनादेश महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानला प्राप्त झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जगदीश कदम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील या वेळी उपस्थित होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा पूर्ण झाला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) याचे लोकार्पण झाले होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भवानी माता मंदिर, गंगासागर आणि रंगमंडल उभारण्याचा प्रतिष्ठानचा मानस असल्याचे जगदीश कदम यांनी सांगितले. सदर कामे ही पुढील वषी शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होताना त्या वर्षाचा समारोप होत असताना पूर्ण होतील, असेही त्यांनी नमूद केले.
अधिक वाचा : पुण्येश्वर मंदिर परिसरातील उत्खननासाठी मनसे आक्रमक