पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस गंभीर नाही. गेल्या चार निवडणुकात काँग्रेसला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे गुरुवारी केली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीला अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संकेत मिळत असून, पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडलेली भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढे मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणुकीबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना गुरुवारी बैठकीत जाणून घेतल्या. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार कमल ढोले-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत कसबा निवडणूक लढविण्याचा ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. पक्षाच्या ताकदीचे राजकीय गणितही बैठकीत मांडण्यात आले.
अधिक वाचा : सत्तेचा गैरवापर करून कुणाला जाणीवपूर्वक अडकवले नाही
काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याचा दावा
काँग्रेसला 1995, 99, 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असून, मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. काँग्रेस निवडणुकीबाबत गंभीर नसल्याने भाजपाला विजय मिळविणे सहजशक्य आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची कसब्यात मोठी राजकीय ताकद असून, संघटनात्मक जाळे मजबूत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेच पोटनिवडणूक लढविणे योग्य आहे, असे राजकीय गणित या बैठकीत मांडण्यात आले.
राष्ट्रवादीचे घूमजाव
दोन दिवसांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने लढवावी, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, असा ठराव पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजूर केला. प्रवक्ते अंकुश काकडे, ऍड. रुपाली पाटील ठोंबरे, रविंद्र माळवदकर यांच्यासह एकूण पाच इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसला पाठविण्यात आली आहेत.
वरिष्ठ नेते निर्णय घेतील : अजित पवार
कसबा विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनाही आग्रही आहे. प्रत्येक पक्षाला जागेबाबत बोलण्याचा अधिकार आहे. पण सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली.
मगच निर्णय जाहीर केला जाईल : प्रशांत जगताप
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कसबा पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भात बैठकीत भूमिका मांडण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत अजित पवार चर्चा करणार आहेत. त्यानुसार पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल.