ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन चाकरमान्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आज सकाळी पावणेसातच्या सुमारास चिंचवड स्थानकात ही घटना घडली.
पिंपरी-चिंचवड स्थानकांवरुन सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आज सकाळी सिंहगड एक्स्प्रेस चिंचवड स्थानकात आली असता बसण्याच्या जागेवरुन चाकरमान्यांमध्ये वाद झाला. बोगीत बसण्याच्या जागेवरुन इतर वेळीही वाद होत असतात मात्र, आज हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत ही भांडणं सोडवली. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
अधिक वाचा : गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरूप
सिंहगड एक्स्प्रेस ही पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड स्थानकातून या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी या एक्स्प्रेसला स्वतंत्र बोगी देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी केली आहे.