पुणे / प्रतिनिधी :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेची हॉलतिकिट विद्यार्थ्यांना सोमवारपासून दुपारी 3 वाजल्यापासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थांना मंडळाच्या संकेतस्थळावर शाळा लॉगीनमध्ये जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करता येणार आहेत. काही तांत्रिक अडचणी आल्यास शाळांनी विभागीय मंडळांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहावीची लेखी परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार (दि. 6) पासून हॉलतिकिट उपलब्ध होणार आहेत. यासाठी मंडळाने काही सूचना केल्या असून यात प्रामुख्याने शाळांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकिटाची प्रिंट काढून द्यायची आहे. तसेच हॉलतिकिटाची ऑनलाईन प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेऊ नये तसेच प्रिंट काढल्यानंतर त्यावर मुख्याध्यापकांची शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी, हॉलतिकिटातील विषय व माध्यमात बदल असतील तर शाळांनी संबंधित विभागीय मंडळांशी संपर्क साधावा, हॉलतिकिटावरील नाव, फोटो, स्वाक्षरी यासंदर्भातील दुरूस्त्या शाळा तरावर करून त्याची सुधारित प्रत विभागीय मंडळाकडे सादर करावी, हॉलतिकिट गहाळ झाल्यास शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने दुबार असा शेरा मारत विद्यार्थ्यांना हॉलतिकिट द्यावे, फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची असल्याचे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
अधिक वाचा : भाजपमध्ये यायचे की नाही, ते सत्यजीत तांबे ठरवतील