ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधीपक्षनेते अजित पवार पक्षातील 7 आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज सकाळीच अजित पवार यांनी मीडियासमोर येत नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर खुलासा केला. मी नॉट रिचेबल नव्हतो. माझे सतत दौरे असतात. त्यामुळे जागरण होते. त्यामुळे मला पित्ताचा त्रास झाला. बरे वाटत नव्हते. त्यामुळे मी औषध घेऊन विश्रांती घेतली. परंतु, मीडियाने त्याचा विपर्यास केला, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी सपत्नीक आज सकाळी खराडीतील एका ज्वेलरी शॉपचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांना विचारले असता, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा महाविकास आघाडीशी झालेली नाही. केवळ मीडियात याची चर्चा आहे. मुळात ही पोटनिवडणूक केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अधिक वाचा : नॉट रिचेबल अजित पवार पोहोचले थेट सोन्याच्या दुकानात
अयोध्येला जा; पण कोरोनाकडेही लक्ष द्या
ज्यांना अयोध्येला जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. मात्र, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी तरी कोरोना परिस्थितीत लक्ष घालावे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. आजची नेमकी परिस्थिती सांगा, असे आम्ही म्हटले होते. अधिवेशनातदेखील याची मागणी केली होती. मात्र, कोरोना संख्या वाढत असली, तरी अजून त्याचे गांभीर्य दिसत नाही. सरकारने याबाबत सांगितले पाहिजे. आदेश काढले पाहिजेत. मुळात मंत्रीच मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनता मास्कचा वापर गांभीर्याने कसा घेणार, हा प्रश्न आहे. जनतेला वस्तुस्थिती सांगायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आपणास काही म्हणायचे नाही. ज्यांना अयोध्येला जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. आमचा त्याला विरोध नाही. मात्र, जे उपलब्ध आहेत, त्या उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी तरी कोरोना परिस्थितीत लक्ष घालावे.