ऑनलाईन टीम/तरुण भारत
Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लागल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटांना नवी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानं पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली आहे. पण ठाकरे गटासमोर एक पेच निर्माण झाला आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिका सेवा नियमावलीनुसार राजीनामा दिल्यानंतर किंवा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आता तो मंजूर व्हावा लागतो. विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांनी रमेश लटकेंच्या निधनानंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिलाय, परंतु अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परबांची चांगली धावाधाव सुरू आहे. परबांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या येरझऱ्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Pune : सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन तुंबळ हाणामारी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानं आता अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने याठिकाणी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र ऋतुजा लटके या मुंबई पालिकेच्या अंधेरीतील कार्यालयात नोकरीस होत्या. त्यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी पालिकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. पण अद्याप हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. आता यामुळे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सहआयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली. त्यांच्याकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा अशी मागणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.