ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर भामट्यांनी छापेमारी केली. त्यानंतर कारवाईच्या बहाण्याने या भामट्यांनी 3 किलो सोन्यासह 25 लाखांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चार भामट्यांनी ईडीचे अधिकारी असल्याचे भासवत झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला. छापेमारीदरम्यान, त्यांनी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातली. तसेच कारवाईच्या बहाण्याने 3 किलो सोने आणि 25 लाख रुपयांची रोकड असा 1 कोटी 70 लाखांचा ऐवज लांबवला. मात्र, हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : पुस्तकांच्या पानांमधून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर 2.5 किलो सोने जप्त