सांगली शहर पोलिसांची कारवाई : एकूण पाच गुन्हे उघडकीस
प्रतिनिधी/सांगली
मिरज तालुक्यातील बुधगाव येथील हनुमान मंदिर आणि सांगली येथील मदिना मशिदमध्ये चोरी करणाऱया चोरटय़ास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. असिफ उस्मान डांगे (19, रा. आरळा, ता. शिराळा, जि. सांगली), असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मदिना मशिदजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याची अंगझडती घेतल्यावर चोरीचे मोबाईल आणि रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्या आरोपीने आपण बुधगाव येथील मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले. तसेच सांगलीतील मदिना मशिदमध्येही चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बुधगाव हनुमान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा रेकॉर्डवरील गुन्हेगार डांगे हा त्यामध्ये स्पष्ट दिसून आला. त्यानंतर त्याला अटक करून आणखीन चौकशी केल्यावर त्याने सांगली शहर पोलीस ठाण्याकडील तीन गुह्यांची कबूली दिली आहे. तर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गुह्याची कबूली दिली आहे. त्याच्याकडून 30 हजार किंमतीचे पाच मोबाईल आणि रोख रक्कम 523 मिळून आली आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, दीपक माने, विजय सुतार, दिलीप जाधव, गुंडोपंत दोरकर, विनायक शिंदे, संदीप पाटील, डॅनियल घाटगे, झकीरहुसेन काझी यांनी केली. याचा पुढील तपास झाकीरहुसेन काझी हे करत आहेत.
हे ही वाचा : दुरुस्तीला पैसे नसल्याने तो चोरायचा दुचाकी