ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे त्यांनी मीडियाला सांगितले. तसेच खासदारांबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले. 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येथे येणार असून, आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या दौऱ्यात शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदे म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी बुधवारी 20 जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसींना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्याच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे आहे. आम्ही ओबीसी आरक्षण खटल्याच्या तयारीबाबत वकिलांशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाबाबत आणखी चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे.
शिवसेनेचे 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येथे येणार असून, आपण त्यांची भेट घेणार आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून, सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर वाढला