कोल्हापूर: कुंभी कासारी (Kumbhi Kasari River) नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यातून वाहत आलेला मृत गवा रेडा या पूलाच्या कठड्याला अडकला होता. हा मृत गवा तात्काळ काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती. त्याबाबत तरुण भारत डिजिटलने बातमी दिल्यानंतर त्याची दखल घेत वन विभागाने हा मृतगवा दुपारी एक वाजता नदीपात्रातून बाहेर काढला.
पहा Video – तरुण भारत इम्पॅक्ट- मृत गव्या रेड्याला वनविभागाने हटवले
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. करवीर तालुक्यातील नद्यांना पूर आल्याची परिस्थिती आहे. आज सकाळी कोगे कुडीत्रे पूल पाण्याखाली गेला. कुंभी कासारी नदीला पूर आल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गाचा खोळंबा झाला.
हेही वाचा- Kolhapur: कोगे- कुडित्रे दरम्यान वाहतूक बंद; पुलावर अडकला मृत गवा रेडा
दरम्यान, पुलावरून पाणी वाहत असताना सकाळी साडे सातच्या सुमारास एक मृत गवा पुलाच्या लोखंडी कठड्याला अडकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा मृत गवा तात्काळ हटवावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्याबाबतची बातमी तात्काळ तरुण भारत डिजिटल ने दिल्यानंतर त्याची दखल वन विभागाने घेतली. वन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दुपारी एक वाजता मृत गव्याला जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून हटवले.