Tarun Bharat

Kolhapur; जि.प.निवडणुकीवर राजकीय अस्थिरतेचा ‘इफेक्ट’; राज्यातील राजकीय घडामोडींमुळे इच्छूक संभ्रमात

शिवसेनेतील बंडाळीमुळे लढतीचे चित्र अस्पष्ट; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘वेट अँड वॉच’; शिवसेनेच्या माजी आमदारांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात; जिह्यात भाजप,जनसुराज्य, शिंदे गटाची होणार युती; मूळ शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता

Advertisements

कृष्णात चौगले / कोल्हापूर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक ज्येष्ठ सदस्यांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांनी पर्यायी मतदार गटात संपर्क वाढवला आहे. पण राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे आपण नेमके कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यायची, आपल्याविरोधात मैदानात किती उमेदवार असणार ? आणि लढत कशी होईल ? याचा इच्छूकांना अंदाज बांधणे कठीण झाले आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यामुळे सेनेचे आणखी काही माजी आमदार शिंदे गट आणि भाजपच्या तंबूत जाण्याच्या तयारीत आहेत. पण मूळ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये सुरु असलेल्या न्यायालयीन वादावर 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार ? यावर त्यांची राजकीय दिशा ठरणार आहे. पक्षीय राजकारणातील या अस्थिरतेमुळे अनेक ठिकाणी स्थानिक आघाडय़ांचे राजकारण पहावयास मिळणार आहे.

अधिक वाचा- शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी किसान सभेकडून रास्ता रोको

सर्वाधिक गट संख्या असलेल्या करवीरमध्ये गोंधळाची स्थिती
करवीर तालुक्यात जि.प.चे सर्वाधिक 13 गट आहेत. हा तालुका ‘करवीर’ व ‘कोल्हापूर दक्षिण’ या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला आहे. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील चित्र पाहता शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे मूळ शिवसेनेत राहणार की शिंदे गट अथवा भाजपशी जवळीक करणार याबाबत त्यांनी कोणतीही भूमीका जाहीर केलेली नाही. आमदार नरके यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यास करवीरमध्ये भाजप, शिंदे गट आणि जनसुराज्य युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध भाजप युती अशी लढत होईल. या तालुक्यात आमदार सतेज पाटील व पी.एन.पाटील यांचे प्राबल्य असले तरी शिवसेना, भाजपकडून कोण उमेदवार दिला जाणार याच्यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर दक्षिणमधील सर्व जि.प.गटात मात्र काँग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.

पन्हाळा-शाहूवाडीत रंगणार तिरंगी सामना
पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे व शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील हे पारंपारीक विरोधक आहेत. जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजप युतीमधील सहयोगी पक्ष असल्यामुळे आणि शिंदे गटही भाजपसोबत असल्यामुळे आमदार सत्यजित पाटील हे मूळ शिवसेनेतच राहतील असा अंदाज आहे. तसेच राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड हे आपले चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसाठी जि.प.च्या मैदानात ताकदीने उतरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीचा तिरंगी सामना पहावयास मिळणार आहे.

हातकणंगलेमध्ये भाजप-जनसुराज्य- शिंदे गटाची युती शक्य

जि.प.च्या गतनिवडणुकीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजप, जनसुराज्यचे वर्चस्व राहिले. आगामी निवडणुकीसाठीही भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राज्यातील सत्तेची ताकद वापरली जाणार आहे. या मतदारसंघात सध्या आमदार राजूबाबा आवळे यांनी जि.प.निवडणुकीचे परफेक्ट नियोजन केले आहे. तर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरेंना साथ देणार की शिंदे गटात सामिल होणार याच्यावर हातकणंगले मतदारसंघातील लढत निश्चित होणार आहे.

आवाडेंची जिल्हा ताराराणी विकास आघाडी
राज्याच्या राजकारणात भाजपसोबत असलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा ताराराणी विकास आघाडीचा फॉर्म्युला बाहेर काढला आहे. या आघाडीच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील 8 जि.प.गट आणि 16 पं.स.गण आणि शिरोळ तालुक्यातील चार जि.प.गट आणि 8 पं.स.गणात उमेदवार दिले जाणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका जाहीर केली आहे.

शिरोळमध्ये दिसणार बहुरंगी लढत
शिवबंधनातून मुक्त होऊन शिंदेशाहीमध्ये सहभागी झालेले माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची परिपूर्ण तयारी केली आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जास्तीत जास्त जागा निवडणूक आणण्यासाठी त्यांनी आराखडा तयार केला आहे. तर शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील हे सद्यस्थितीत शिवसेनेत आहेत. त्यामुळे जि.प. निवडणुकीच्या मैदानात ते किती ताकदीने उतरतात याच्यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून शिरोळ मतदारसंघ हे संघटनेचे ‘होम पिच’ आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीसह आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीकडूनही ताकद आजमावली जाणार आहे.

राधानगरीत राजकीय पहावयास मिळणार ‘राजकीय खिचडी’

राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी त्यांचे पारंपारिक विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील यांच्याशी सामना रंगणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचीही ताकद असून मेरीटचे उमेदवार दिले जाणार आहे. येथे मूळ शिवसेना काय भूमिका घेणार हे निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे.

कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप
कागल विधानसभा मतदारसंघात माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रबळ आहे. पण राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची ताकद वाढली आहे. तसेच खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे त्यांची ताकद कोणाला मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पक्षीय अडचणींच्या ठिकाणी होणार स्थानिक आघाड्य़ा
ज्या तालुक्यात पक्षीय पातळीवर जि.प.च्या निवडणूका लढवणे अशक्य आहे, त्या ठिकाणी स्थानिक आघाडय़ा होणार आहेत. गत निवडणुकीत चंदगड विकास आघाडी, दोन ताराराणी आघाडय़ा, आमदार प्रकाश आबिटकर याची स्वतंत्र आघाडी अशा सुमारे चार स्थानिक आघाडय़ा झाल्या होत्या. त्याच पद्धतीने सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षीय बंधने बाजूला ठेऊन अनेक ठिकाणी स्थानिक आघाडय़ांच्या झेंडय़ाखाली निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकत्र येऊन नवा ‘डाव’ मांडला जाणार आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

Abhijeet Shinde

चंदूरमध्ये युवकाची आत्महत्त्या

Abhijeet Shinde

प्रायोगिक लसीकरण उद्यापासून

Abhijeet Shinde

बेटी बचाव फाऊंडेशनमार्फत स्कूल बॅगचे वाटप

Abhijeet Shinde

राज्यातील महाआघाडी पॅटर्न गल्लीतही

Abhijeet Shinde

कोल्हापूर भाजपचे पदाधिकारी मुंबईला रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!