पुणे / वार्ताहर :
कोरेगाव पार्कमध्ये दोन टोळय़ांमधील वादातून घडलेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण भाई असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले.
याप्रकरणी नितीन सकट (21) आणि गणेश राखपाखरे (21, दोघे रा. राखपाखरे वस्ती, लोहगाव, पुणे) व त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द दहशत पसरवणे आणि आर्म ॲक्टनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी दारु पिले. त्यानंतर आपणच परिसरातील भाई आहोत, आपला परिसरात वट पाहिजे, अशी त्यांची चर्चा झाली. यानंतर ते संत तुकाराम चौकात दुचाकीवरुन आले. तेथे नितीन सकट याने पिस्तूल बाहेर काढून हवेत दोन गोळय़ा झाडल्या. तेथे उपस्थितांना धमकावत कोणी आमच्या वाटय़ाला गेले तर आम्ही एकएकाला गोळय़ा घालू, कोणालाही जीवंत सोडणार नाही, असा दम भरला. त्यानंतर ते दुचाकीवरुन गणपती चौकात गेले. तेथे सकटने पुन्हा एकदा हवेत गोळी झाडली. तेथेही आरडाओरडा करत नागरिकांना दमदाटी केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाचा तपास शांतमल कोळळूर करत आहेत.
अधिक वाचा : सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; कोठडीतच तुरुंग अधिकाऱ्यासोबत ‘VIP चर्चा’
कोरेगाव पार्क गोळीबारातील आरोपी जेरबंद
कोरेगाव पार्क परिसरातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने 24 तासात अटक केली. सराईत गुन्हेगार यल्लाप्पा कोळनट्टी याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील 5 ते सात गुन्हेगारांनी गोळीबार करत हल्ला चढवला होता. याप्रकरणी समांतर तपास करत असताना नट्टा मोहन म्हस्के (32) आणि संतोष सिध्दार्थ चव्हाण (27, दोघेही रा. तताडीवाला रस्ता, पुणे) या दोघांना अटक केली आहे. जखमी यल्लाप्पा याच्यासह प्रतिस्पर्धी टोळीतील सर्व गुन्हेगार सराईत आहेत. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयात एका तडीपार गुन्हेगाराचाही समावेश असून, त्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.