ऑनलाईन टीम/तरुण भारत
Gujarat Crime : गुजरातनजीकच्या भारतीय सागरी हद्दीत तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) संयुक्तपणे आज सकाळी मोठी कारवाई केली. एटीएसने संयुक्त कारवाई करत एक पाकिस्तानी बोट ड्रग्जसह पकडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने सुमारे ४० किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत ज्याची किंमत सुमारे २०० कोटी आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ही पाकिस्तानी बोट पकडण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त पथकाने कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरापासून नजीक ३३ सागरी मैलावर एक मच्छीमार नौका अडवली. ही नौका पाकिस्तानी होती आणि त्यात ड्रग्ज असल्याचे आढळले. गुजरातच्या किनाऱ्यावर उतरवल्यानंतर हे अंमलीपदार्थ रस्तामार्गे पंजाबमध्ये नेण्यात येणार होते, अशी माहिती एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिली.
एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीसह सहा पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एक संशयास्पद नौका गुजरातच्या किनाऱ्यावर येणार असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्यानुसार तटरक्षक दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. नौकेवरील सहा पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे ४० किलो हेरॉइन सापडल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. गुजरात एटीएसने गेल्या नऊ महिन्यांत केवळ गुजरातच नव्हे तर, विविध राज्यांमध्ये छापे टाकून सुमारे ६ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
हे ही वाचा : मस्कत विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून निघाला धूर; १४ जखमी