पुणे / वार्ताहर :
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगची मोठी दहशत निर्माण झाली आहे. वेगवेगळया भागात कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशाचप्रकारे येरवडा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये गजराज चौकात अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने सहा महिन्यापूर्वीच्या फुटबॉल खेळण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणावर कोयताने वार करुन त्याला गंभीर जखमी केले.
या घटनेत अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय 19, रा. येरवडा, पुणे) हा तरुण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 15 ते 16 वयोगटातील चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेऊन नाटीस बजावली आहे. ही घटना 28 जानेवारीच्या रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात मागील सहा महिन्यापूर्वी फुटबॉल खेळण्यावरुन वाद झाले होते. त्याचा राग मनात धरुन तक्रारदारर अब्दुल्ला खान हा त्याच्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवरुन जात असताना, अल्पवयीन आरोपींनी त्याची मोटारसायकल आडवून थेट लाकडी बांबूने मारहाण करत कोयत्याने वार केले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस पाटील करत आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द