पुणे / प्रतिनिधी :
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती कळविली आहे.
शिवसृष्टी हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होत आहे. यावेळी पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडय़ाचे लोकार्पण शाह करणार आहेत. ‘सरकारवाडा’ या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन व बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गडाकिल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.
अधिक वाचा : नासाच्या ‘आर्टेमिस-1’ चे यशस्वी प्रक्षेपण
चार टप्प्यात तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यासाठी देणगीदारांकडून 60 कोटी रुपये मिळाले आहेत. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदर यांनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला, या सगळय़ांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला सुरुवात झाली आहे.
भविष्यात पूर्णत्वास येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये 21 एकर परिसरात एक दिवसांची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून, महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिऍलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरु केलेल्या चलनी शिवरायी व राजमुद्रा, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदीर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल. ‘मॅड मॅपिंग’ सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवप्रेमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू शकतील, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़ असणार आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा 1 डिसेंबर पासून शिवप्रेमींसाठी खुला होणार असून, यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.