ऑनलाईन टीम / तरुण भारत :
5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लवकरच नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस उपलब्ध होणार आहे. डीसीजीआयने नुकतीच 18 वर्षावरील लोकांसाठी इंट्रानेझल कोरोना लस iNCOVACC ला मान्यता दिली आहे. त्यानंतर 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी याच लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासासाठी भारत बायोटेकने औषध नियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.
भारत बायोटेकने आयएनसीओव्हीएसीसीची सुरक्षा, प्रतिक्रियाशीलता आणि इम्युनोजेनिसिटीचे मूल्यांकन करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील परवानगीसाठी अर्ज केला आहे. ही लस नाकावाटे दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या दिल्या जात असलेल्या लसीप्रमाणे सुईची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. ही लस घरीही घेता येईल. नाकावाटे लस दिली जाणार असल्याने सुईमुळे लसीकरणानंतर होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल.
अधिक वाचा : बेल्टमधून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर 12 किलो सोने जप्त
नाकावाटे लस दिली जाणार असल्याने कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्यापूर्वीच मारण्याची क्षमता त्यात आहे, त्यामुळे शरीराच्या अवयवांना संसर्ग निर्माण होण्याचा धोका राहणार नाही. या लसीमुळे नाकात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.