ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या सदाशिव पेठतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत 6 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला. सकाळी पावणे 11 च्या सुमारास ही घटना घडली.
इकरा नईम खान (वय 6) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. भिकारदास मारुती जवळील एका हॉटेलमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास आग लागली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केल्याने कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली. काही मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक महिला आणि तीन मुलं या अगीत अडकल्याची माहिती मिळाली. महिला आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. मात्र, हॉटेलच्या पोटमाळय़ावर अडकलेल्या मुलीला बाहेर काढेपर्यंत ती गंभीररित्या भाजली होती. तिला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.
अधिक वाचा : पुण्यात 10 लाखांचे सेक्स टॉईज जप्त
अग्निशमन दलाने हॉटेलमधील तीन सिलिंडर बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.