लोणावळा : भुशी धरणावर होत असलेली पर्यटकांची गर्दी व पावसाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी 5 नंतर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. आठवड्याचे सर्व दिवस हा नियम लागू असेल, अशी माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.
भुशी धरणाजवळ नौसेना बाग येथे पोलिसांनी याकरिता चेकपोस्ट लावला असून याठिकाणाहून प्रवासी वाहने मागे पाठवली जात आहेत. ज्या पर्यटकांची भुशी धरणाच्या पुढे हाॅटेल बुकिंग आहे. त्यांचीच वाहने बुकिंगची अधिकृत पावती तपासून सोडली जाणार आहेत. कोणीही चुकीच्या पद्घतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला अथवा पर्यटनस्थळांवर मिळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मागील आठवडाभरापासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. भुशी धरणाच्या पायर्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत आहे. तेथे जाणे धोकादायक झाले आहे. दोन दिवसापूर्वी धरणाच्या मागील धबधब्यात पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. अशा अपघाती घटना टाळण्यासाठी हा नियम लावण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक डुबल यांनी सांगितले. सोबतच पर्यटकांना मार्गदर्शनासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहे.
हुल्लडबाज व मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई केली जात आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहने चालविणे, रस्त्यावर वाहने उभी करत वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणे, राॅंग साईडने वाहन चालविणे असे प्रकार करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. लोणावळा परिसरातील पाऊस व धुके पाहता पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा : अतिवृष्टीमुळे पुणे व पिंपरीतील शाळा उद्या बंद