जिल्हा क्रीडा कार्यालयास मिळाले 7 स्पर्धांचे यजमानपद : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सोपवली जबाबदारी
संग्राम काटकर, कोल्हापूर
Kolhapur Sport News : तीन महिने उशिराने का होईना पण आता राज्यात शालेय क्रीडा स्पर्धा होणार हे नक्की झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून शहर, तालुका, जिल्हा, विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश राज्यातील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्य़ांना मिळाले आहेत. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने कोणते जिल्हा क्रीडा कार्यालय कोणत्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार हेही निश्चित केले आहे.
स्पर्धा आयोजनासंदर्भात बालेवाडीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार 7 राज्यस्तरीय स्पर्धाचे यजमानपद कोल्हापूरकडे देण्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे कोल्हापुरात धुमशान रंगणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे देशपातळीवर शालेय क्रीडा झाल्या नाहीत. यंदाचे शालेय वर्ष सुरु होण्याआधी कोरोना नियंत्रणात आल्याने पूर्ण क्षमतेने शालेय स्पर्धा होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार जुलै महिन्यात सुब्रतो मुखर्जी 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा झाल्या. आता 14, 17 व 19 या वयोगटांमधील विविध क्रीडा स्पर्धाही होतील हे जगजाहीर होते. मात्र याचवेळी राष्ट्रीय शालेय स्पर्धा आयोजनाची रुपरेषा ठरवणाऱ्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामध्ये वादाची ठिणगी पडली. फेडरेशनमध्ये दोन गट पडले. पुढे या दोन्ही गटांनी यंदाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आम्हीच आयोजित करणार असा तगादा भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाकडे लावून धरला. मात्र मंत्रालयाला वादावर पडदा टाकून राष्ट्रीय स्पर्धा अधिकृतपणे कोण आयोजित करणार हे निश्चित करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता जोपर्यंत दोन्ही गटातील वाद मिटणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा होणार नाहीत, हे स्पष्ट झाले. याचा परिणाम क्रीडाक्षेत्रातील अग्रेसर महाराष्ट्राला भोगावा लागला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यात राज्यात तालुका, जिल्हा, विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले.
अधिक वाचण्यासाठी-👉 भाजपचे ‘मिशन टेन प्लस टू’ पण….?
दुसरीकडे स्पर्धा कधी सुरु होणार अशी विचारणा शाळा, खेळाडू व क्रीडा संघटनांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयासह प्रत्येक जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सातत्याने होऊ लागली. अशातच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे मोठे सणं आल्याने संचालनालयाने क्रीडा स्पर्धा आयोजन करणेच टाळले. आता दिवाळीनंतर तरी स्पर्धा होतील का, स्पर्धाच झाल्या नाहीत तर दहावी-बारावीच्या खेळाडूंना मिळणाऱ्या हक्काच्या ग्रेस गुणांचे काय होणार अशीही विचारणा होऊ लागली. या विचारणेची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी अलीकडेच बालेवाडीत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यामध्ये यंदा राष्ट्रीय स्पर्धा होवोत न होवोत, नोव्हेंबरपासून शहर, तालुका, जिल्हा, विभागीय स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश दिवसे यांनी दिले. शिवाय राज्यस्तरीय स्पर्धा कोणते जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित करु शकते हेही जाहीर करावे, असेही दिवसे यांनी बैठकीत सांगितले.
त्यानुसार कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी 7 राज्यस्तरीय स्पर्धाचे यजमानपद कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे मिळाले, असा प्रस्ताव मांडला. विविध खेळांच्या स्पर्धा आयोजनासाठीचे इफ्रास्ट्रक्चर कोल्हापुरात असल्याचे साखरे यांनी पटवून सांगितले. आयुक्त दिवसे यांनी साखरे यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवत सातही स्पर्धांचे यजमानपद कोल्हापुराकडे सोपवले आहे. त्यामुळे डिसेंबर-जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय स्पर्धांच्या धडाक्याने क्रीडानगरी कोल्हापूर गाजणार आहे.
अधिक वाचण्यासाठी👉व्यायामपटुंची पिढी घडवणारा बिभिषण….
नोव्हेंबरमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा…
नोव्हेंबर महिन्यापासून शहर, तालुका, जिल्हा व विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाला सुरुवात होईल. सध्या जिल्हा क्रीडा कार्यालय स्पर्धांचे नियोजन करत आहे. नियोजन लवकरच पूर्ण करुन स्पर्धाच्या तारखा जाहीर केल्या जातील.
चंद्रशेखर साखरे (जिल्हा क्रीडा अधिकारी)
कोल्हापूरात वयोगटनिहाय होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा अशा –
-फुटबॉल, योगा व सॉफ्टबॉल-14, 17 व 19 वर्षाखालील मुले-मुली.
-बास्केटबॉल, हॉकी, टेनिस, व्हॉलीबॉल-19 वर्षाखालील मुले-मुली.