प्रतिनिधी / जळगाव :
राज्यभर गाजलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांची आज बिनविरोध निवड झाली. निवड होताच अध्यक्षांच्या दालनात असलेली राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिमा गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून तत्काळ हटवली गेल्याने दूधसंघातील खडसेराज संपुष्टात आले.
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक ही राज्यभर गाजली. भाजप शिंदे गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असे स्वरूप या निवडणुकीला आले होते. दूधसंघातील खडसे राज संपवण्यासाठी भाजपा शिंदेगटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनगर मतदारसंघातून दूध संघाच्या अध्यक्ष मंदा खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल करीत खडसेंना आव्हान दिले होते. यात मंदा खडसेंचा पराभव झाला पण एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. खडसेंविरोधात आवाज उठवणारे आ. मंगेश चव्हाण हे संपूर्ण निवडणुकीचे महानायक ठरले.
अधिक वाचा : पाकच्या महिल्या मंत्र्याची भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी
शनिवारी रात्री निवडून आलेल्या संचालकांची बैठक होऊन दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आ. मंगेश चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले. आज सकाळी दूध संघात नवनिर्वाचित संचाकांची बैठक झाली असता त्यात आ. मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला असता त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
खडसेंची प्रतिमा हटवली
निवडीनंतर आ. मंगेश चव्हाण हे अध्यक्षांच्या दालनात स्थानापन्न झाले. तेथे भिंतीवर एकनाथ खडसेंचा फोटो होता. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रोटोकॉलनुसार महापुरूषांचे, राष्ट्रपती पंतप्रधानांचे केवळ फोटो असतात जिवंत माणसाचे फोटो कशाला लावायचेत असे सांगत खडसेंचाफोटो तात्काळ काढण्याची सूचना केली आणि काही क्षणात दूध संघाच्या कर्मचाऱयाने खडसेंचा फोटो काढून टाकला आणि दूध संघातील खडसे राज संपुष्टात आले.