जिल्हाप्रमुख संजय पवार : पदाधिकारी फोडण्याचे काम थांबवा : निष्ठावंत शिवसैनिक गळाला लागणे अशक्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकारी कोकणातील एजंटांच्या माध्यमातून फोडण्याचे काम शिंदे गटाकडून सुरु आहे. त्यांच्याकडून पद आणि आर्थिक आमिष दाखवली जात आहे. मात्र निष्ठावंत शिवसैनिक अशा आमिषांना बळी पडणार नाही. त्यामुळे जिल्हय़ातील एकही पदाधिकारी त्यांच्या गळाला लागलेला नाही. शिंदे गटाच्या एजंटांनी हे काम तत्काळ थांबवावे, अन्यथा एजंट शिवसैनिकांच्या हाती लागल्यास त्यांच्या सेना स्टाईलने समाचार घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पवार म्हणाले, शिंदे गटाच्या एजंटांकडून राज्यभर शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचे काम सुरु आहे. जिल्हय़ातील पदाधिकाऱयांची जबाबदारी कोकणातील एजंटांवर दिली आहे. सोळा ते सतरा पदाधिकाऱयांशी दूरध्वनीवरुन या एजंटांनी संपर्क साधला आहे. यावेळी त्यांना पदासह आर्थिक आमिषही दाखविण्यात आले आहे. मात्र जिल्हय़ातील पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याने एकही पदाधिकारी या एजंटांच्या हाती लागलेला नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे एजंटांच्या भुलथापांना शिवसैनिकांनी बळी पडू नये. जे पदाधिकारी बळी पडतील त्यांना शिवसैनिक जाब विचारतीलच अन् त्यांनाही सध्या घेतलेल्या निर्णयाचा पुढील काळात पश्चाताप होईल, असे पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : बंडखोर शिंदे गटाला धडा शिकवा
पक्षप्रमुखांना एक लाख सभासदांची भेट
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जन्मदिनी हार, बुके न आणण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या जन्मदिनी जिल्हय़ात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र पक्षप्रमुखांना त्यांच्या जन्मदिनी मातोश्रीवर शुभेच्छा देताना एक लाख सभासद नोंदणीचे अर्ज भेट स्वरुप देणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. तीनही जिल्हाप्रमुखांकडून सभासद नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे देवणे यांनी सांगितले.