ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Section 144 applicable in Pimpri-Chinchwad Police Commissionerate area वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 2 जानेवारी 2023 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. शहरात हत्यारांचे उत्पादन आणि अवैध सिम कार्ड विक्रीही मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार नऊ इंच किंवा त्यापेक्षा जास्त लोखंडी पाते असलेला कोयता, पालघन किंवा तत्सम लोखंडी हत्यार विक्रीसाठी बनवणे आणि विक्री करणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लागू नसणार आहे.
अधिक वाचा : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक
तसेच मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनाही ग्राहकांची योग्य पडताळणी आणि खात्री केल्याशिवाय सिमकार्डची विक्री करता येणार नाही. ग्राहकांची नोंद त्यांना ठेवावी लागणार आहे. ही नोंदवही अभिलेख स्वरुपात किमान 5 वर्षांकरता जतन करावी, असेही आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.