पिंपरी / प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या 13 प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान 3 टक्क्याने घटले आहे. भाजप, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे त्रिभाजन झाले आहे. पोटनिवडणूक असूनही एकीकडे मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले असताना दुसरीकडे उमेदवारांच्या बालेकिल्ल्यातच मतदारांनी निरूत्साह दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या जागेसाठी रविवारी (दि. 26) मतदान झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवडमध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 50.47 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 28 उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत होती.
अधिक वाचा : संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; ATS ची कारवाई
महापालिकेच्या 13 प्रभागांचा अर्थात 52 नगरसेवकांचा समावेश या मतदारसंघात आहे. त्यामध्ये तब्बल 33 नगरसेवक भाजपचे आहेत. 9 राष्ट्रवादीचे, 6 शिवसेनेचे तर, अपक्ष चार जण आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचा प्रभाव आहे. मात्र, उमेदवारांच्या बालेकिल्ल्यातच मतदारांनी निरूत्साह दाखवल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.