लोणावळा / वार्ताहर :
लोणावळय़ात वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक सोमवारी दुपारी भुशी धरणात बुडाल्याची घटना घडली होती. त्याचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्कू पथकाला यश आले आहे. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
साहिल सरोज (वय-19, रा.मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे सुमारे 250 पेक्षा अधिक सहकारी पाच बसेसने सोमवारी लोणावळा व खंडाळय़ात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. सोमवारी दुपारी सर्व सहकारी भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेले होते. यावेळी धबधब्याच्या मोठय़ा प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून येताना साहिलचे पाण्यात नियंत्रण सुटल्याने तो वाहत जाऊन धबधब्यावरून सुमारे 25 ते 30 फूट उंचीवरून खाली वाहत जाऊन भुशी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध सुरु केला. तसेच शोध कार्यासाठी लोणावळय़ातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री साडेसात वाजेपर्यंत शोध घेतल्यानंतर मोहिम थांबविण्यात आली होती. आज सकाळपासून पुन्हा शिवदुर्ग रेस्कू पथकातील प्रणय अंबुरे, प्रविण देशमुख, अजय शेलार, समीर जोशी, ओंकार पडवळ, आयुष वर्तक, महेश मसने, राजेंद्र कडू, कुणाल कडू, रोहित वर्तक, सागर कुंभार, सुनिल गायकवाड यांनी शोधमोहीम राबवत पाण्यातून साहिलचा मृतदेह बाहेर काढला.
हेही वाचा : खडकवासला धरण 100 टक्के भरले