पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत, असा टोला आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.
धंगेकर म्हणाले, पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहेत. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याचे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 40 टक्के मिळकत करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवामुळे घ्यावा लागला आहे.
अधिक वाचा : राज्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
आता मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 500 फुटाच्या घरांनादेखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याची भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.