ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागांवर निवडणूक लढेल. उर्वरित 48 जागा शिंदे गट आणि मित्रपक्षांना मिळतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून वेगवेगळय़ा प्रतिक्रीया उमटत आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला आम्हाला सोबत घ्यायचे नसेल तर आम्ही स्वबळावर लढू, असे जानकर यांनी म्हटले आहे.
जानकर म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत जे वक्तव्य केलं होतं त्यावरुन भाजपने जागावाटप जाहीर केल्याचे समजते. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर काही हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू, आता आपल्या पक्षाचे दोनच आमदार आहेत. मी वरच्या सभागृहात आणि एक खालच्या सभागृहात आहे. आता आपल्याला आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे.
अधिक वाचा : राज्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
सध्या रासपकडे 98 जिल्हा परिषदा आणि 3 सभापती देखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला टेक्नकिली मान्यता मिळाली आहे. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही जागा मागत आहोत. लोकसभेला आम्ही पाच जागा मागितल्या आहेत. जर त्यांना हा प्रस्ताव मान्य नसेल तर आम्ही स्वबळावर लढू.