ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर धरपकड करत आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह 6 जणांना अटक केली. पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके आणि रुपेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची नावे असून, एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद निष्ठा यात्रा काल रात्री 8 वाजता कात्रजमध्ये आली होती. कात्रज चौकातील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना तेथून उदय सामंत ताफा जात होता. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीस लक्ष्य केले.
पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे शहरातील दौऱ्याच्या निमिताने आमनेसामने आले होते. त्यामुळे तणावाची स्थिती होती. त्यात तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण, असा सवाल केल्याने शिवसैनिक आधीच खवळले होते. सामंत यांचा ताफा पाहिल्यानंतर ते अधिकच संतप्त झाले. या प्रचंड गर्दीस आवरणे पोलिसांनाही कठीण जात होते. संतप्त शिवसैनिकांनी चपला, बाटल्यासह सामंत यांच्या कारवर दगडांचा मारा केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटून गाडीतील एक जण जखमी झाला.
आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकात असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली होती.
हेही वाचा : राज्यात तुरळक पावसाचा इशारा, चार ऑगस्टनंतर जोर वाढणार