उदगाव /वार्ताहर
गुरुवारी सायंकाळी घरातून खेळाला जातो म्हणून सांगून गेलेल्या बालकाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी जवळच्या विहिरीत सापडला. उदगाव (ता. शिरोळ) येथील साखळे मळा येथे राहणाऱ्या संकेत बामणे (वय ८) असे बालकाचे नाव आहे. तब्बल १० ते १२ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती लागण्यास एनडीआरएफ च्या पथकाला यश मिळाले. मृतदेह बाहेर काढताचं कुटुंबियाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा- खासदार धनंजय महाडिकांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
याबाबत अधिक माहिती अशी, संकेत हा गुरुवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शाळेतून घरी आला. त्यानंतर तो अभ्यास करत बसला होता. सुमारे पावणे सातच्या सुमारास खेळून येतो असे सांगून घरातून बाहेर पडला ते रात्री दहापर्यंत घरी न आल्याने सर्वांनी शोधाशोध सुरु केली. त्याचा शोध न लागल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद त्याच्य़ा कुटुंबाने केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह 20 कर्मचारी दाखल होऊन त्यांनी शोधाशोध सुरु केली.
हेही वाचा- दैनिक तरुण भारत इम्पॅक्ट : कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने डेंगूनाशक औषध फवारणी
यावेळी घराजवळ असलेल्या विहिरीच्या काठावर संकेत याचा शर्ट व चड्डी आढळून आली. त्यावरून जयसिंगपूर पोलिसांनी संकेत पडला असावा असा अंदाज बांधत रेस्क्यू फोर्सच्या साह्याने गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता शोधमोहिम सुरू केली. शोधकार्य पहाटे पाच वाजता पावसामुळे थांबवण्यात आले त्यानंतर सकाळी सात वाजल्यानंतर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकासह विविध सहा रेस्क्यू फोर्स दाखल झाल्या तरीही मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी टाकळीवाडी येथे दाखल झालेल्या एनडीआरएफ च्या पथकाला प्रचारण केले. त्यानंतर या पथकाने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताचं कुटुंबियाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.