ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गुजरातच्या वडोदरामध्ये ऐन दिवाळीत जातीय हिंसाचार उसळला. सोमवारी मध्यरात्री दोन धार्मिक गट आपापसात भिडले. यावेळी जमावाने स्ट्रीट लाईट बंद करून जोरदार दगडफेक केली, अनेक वाहनांची जाळपोळही केली. हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकले. सुदैवाने पोलीस या हल्ल्यातून बचावले.
पोलीस उपायुक्त यशपाल जगनिया म्हणाले, सोमवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पानीगेट मुस्लीम मेडिकल कॉलेजजवळ फटाके फोडण्यात आले. यावरून दोन गटात वाद सुरू झाला. त्यानंतर एका गटाने स्ट्रीट लाईट बंद करून दगडफेक सुरू केली. तसेच समाजकंटकांनी रस्त्याशेजारी उभी असणारी वाहने आणि सामानांची जाळपोळ केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले. सध्या या ठिकाणची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिंसाचारप्रकरणी आज सकाळी १९ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींकडेही चौकशी केली जात आहे.
अधिक वाचा : धक्कादायक! पुण्यात अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात एक अधिकारी थोडक्यात बचावला. या घटनेचे अनेक फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पोलिसांवर कशा प्रकारे पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले हे दिसून येत आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.